मुंबई :
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि गायिका सुगंधा मिश्रा यांना धमकीचे ई-मेल आले आहेत. पाकिस्तानकडून ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर संबंधित कलाकारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले आहे की, आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही तुम्हाला एका संवेदनशील प्रकरणाची माहिती देणे महत्त्वाचे आहे. हा पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला हा संदेश अत्यंत गांभीर्याने आणि गोपनीयतेने घेण्याचे आवाहन करतो. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्याचा तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
ई-मेलमध्ये पुढे असे लिहिले आहे की आम्हाला पुढील 8 तासांत तुमच्याकडून तत्काळ प्रतिसादाची अपेक्षा आहे, अन्यथा आम्ही असे गृहीत धरू की तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आणि आम्ही आवश्यक ती कारवाई करू. ई-मेलच्या शेवटी विष्णू असे लिहिले आहे.
तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही धमकी पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कलाकारांना धमकीचे ई-मेल पाठवल्यानंतर त्यांचे चाहते आणि कुटुंबीयही चिंतेत आहेत.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ती थेट सिंडिकेट फीडमधून प्रकाशित केली आहे.)
