नवी दिल्ली:
संसदेचे सत्र LIVE: संसदेचे हिवाळी अधिवेशन आतापर्यंत कामकाजाच्या दृष्टीने थंड राहिले आहे. संभल, मणिपूर अशा अनेक मुद्द्यांवरून गदारोळ होऊन राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज वारंवार विस्कळीत झाले. लोकसभेत आजही गदारोळ होण्याची शक्यता आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक आज लोकसभेत मांडले जाऊ शकते. भाजपने आपल्या लोकसभा खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे, त्यामुळे मंगळवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे. भाजपचे लोकसभेतील चीफ व्हीप डॉ. संजय जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे. दुसरीकडे, आज राज्यसभेतही ‘संविधानावर चर्चा’ होणार आहे.
20 डिसेंबरपर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन आहे. याआधी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, सोमवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले नाही. 12 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने दोन मसुदा कायद्यांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी एक घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याशी संबंधित आहे, तर दुसरे विधेयक विधानसभेच्या तीन केंद्रशासित प्रदेशांसाठी एकाच वेळी निवडणुका घेण्याशी संबंधित आहे.